मुलीचा विनयभंग करणार्‍या दोघांना दोन वर्षांची शिक्षा,नगरमधील घटना

0
48

अहमदनगर -अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबद्दल प्रतिक अनिल शिंदे (वय 21 रा. हराळे हॉस्पिटलमागे, नगर कल्याण रस्ता) व मयुर लाला कांबळे (वय 18 रा. आंबिका हॉटेलमागे, केडगावदेवी) या दोघांना दोन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी ठोठावली. अ‍ॅड. अनंत चौधरी यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

अल्पवयीन मुलगी 4 ऑक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी चार वाजता बालिकाश्रम रस्त्याने दुकानात पायी चालत जात असताना प्रतिक शिंदे आणि मयुर कांबळे हे दुचाकीवरून आले. हॉर्न वाजवून तिला छेडले. दुचाकी तिच्याजवळ घेऊन तिच्याशी गैरवर्तन केले. मुलीने घरी जाऊन सदरचा प्रकार तिच्या आई- वडिलांना तसेच भावाला सांगितला. त्यानंतर मुलीचे वडील व भाऊ हे प्रतिक शिंदे व मयुर कांबळे यांना समजावून सांगण्यास गेले असता, त्यांनी तेथे पडलेली विट हातात धरून तिच्या भावास मारहाण केली. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द विनयभंग आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर यांनी गुन्ह्याचा तपास करून प्रतिक शिंदे आणि मयुर कांबळे यांच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सदरच्या खटल्यात महिला पोलीस अंमलदार राणी बोर्डे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना विनयभंग केल्याबद्दल दोन वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसारही दोन वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा ठोठावली आहे.