अहमदनगर- दलालामार्फत अवैधरित्या भारतात घुसखोरी करणार्या चार बांगलादेशी नागरिकांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना सात दिवस (1 सप्टेंबरपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिक व नगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी चौघांना नगर शहराजवळ खंडाळा येथून ताब्यात घेत अटक केली होती.
संशयित आरोपी मो. मोहीउद्दीन नाझीम शेख (36), शहाबुद्दीन जहांगीर खान (27), दिलावरखान सिराजउल्ला खान (27) व शहापरान जहांगीर खान (20, सर्व रा. सध्या शिवशक्ती स्टोन क्रशर, खंडाळा, मुळा रा. बांगलादेश) यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह त्यांना सहाय्य करणारे रासल एजाज शेख, सोहेल (रा. नोहाखेरी, बांगलादेश), माणिक खान, नोमान, अब्दुल कादर (रा. बांगलादेश), कोबीर मंडल (रा. नॉर्थ 24 परगना, पश्चिमबंगाल, पूर्ण नाव पत्ते माहिती नाही) यांच्या विरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
संशयित आरोपींना घुसखोरीसाठी मदत करणारे, बनावट कागदपत्रे तयार करून देणार्यांचा शोध घ्यायचा आहे, त्यांच्या समवेत आणखी कुणी साथीदार आहेत का, याचाही शोध घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी केली. न्यायालयाने चौघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.