अहमदनगर : शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून किरकोळ स्वरुपापासून ते खुन होईपर्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे रोजच दाखल होत असून सदरच्या घटनेमध्ये तोफखाना पोलीस स्टेशन हे सातत्याने चर्चेत येत आहे. त्याला कारणही तसेच असून तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या तीन महिन्यापासून दोन खुना सारखे गंभीर गुन्हे व 307 सारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. सदर घटनेमध्ये टोळी करुन युवकांना टारगेट करुन मारण्यात आले आहे. तसेच काही युवकांवर चाकू, तलवार, सत्तुर, कोयता, गावठी कट्टा अशा हत्यारांनी मारहाण करुन व भिती दाखवून शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला आहे. या सर्व घटनांबाबत पोलीस अधीक्षक यांना वारंवार कायदेशीर कारवाई करणेबाबत अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी जावक क्रमांक 426/1/23 दिनांक 17/07/2023 रोजी समक्ष भेटून तक्रारी निवेदन दिले होते. तसेच आम्ही तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना याबाबत लेखी व तोंडी कळविले होते. परंतु तोफखाना पोलीस निरीक्षक हे कोणत्याही प्रकारे अशा गंभीर स्वरूपाच्या मारामारीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यात प्रभावी ठरलेले नाही. आम्ही या आधी वारंवार पोलीस प्रशासनाला अहमदनगर शहरामध्ये नाकाबंदी, बिना नंबरच्या गाड्यांवर कारवाई, काळ्या काचांच्या गाड्यांवर कारवाई तसेच महाविद्यालयीन परिसरात पोलीस गस्त वाढविणे व महाविद्यालयीन युवकांकडे असलेल्या मोटारसायकलिंच्या डिक्क्या तपासून त्यामध्ये काही घातक शस्त्र आहे का याची खातरजमा करणे याबाबत आम्ही पोलीस प्रशासन यांना वारंवार विनंती करीत माहिती दिली मात्र आजतागायत कोणतीच उपाययोजना झाली नाही तरी तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनातून केली
निवेदनात पुढे म्हटल की, अहमदनगर शहरातील न्यू आर्टस कॉलेज समोर महाविद्यालयीन युवकांमध्ये जोरदार मारामारी होऊन यात कोयत्या सारख्या घातक शस्त्राचा वापर केला असल्याने सदर युवक हा गंभीर जखमी झाला असून तो आज औषधोपचार करत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महाविद्यालयीन तरुणांकडे घातक शस्त्र असल्याचेच दिसून येते व पोलीस प्रशासनाने वेळीच आम्ही सांगितली तशी कारवाई केली असती तर आजची घटना घडली नसती. व त्या युवकावर प्राणघातक हल्ला झाला नसता. पोलीस निरीक्षक साळवे हे पोलीसांचा वचक व धाक निर्माण करण्यास असमर्थ असून त्यांच्याकडून अशा घटनांना आळा बसावा अशी कोणतीही ठोस कारवाई करताना दिसून येत नसून त्यांच्यामुळे अहमदनगर शहराचे विशेष करुन तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वातावरण हे गुंडगिरीचे झाले असून सामान्य जनतेमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. पोलीस निरीक्षक साळवे यांच्या आशिर्वादाने आज ही तोफखाना पोलीस स्टेशन, हद्दीत अवैध धंदे हे जोमात सुरु असून त्यामुळे त्यातून होणाऱ्या अर्थकरणातून काही फायदा हा स्वतः साळवे यांना होत असल्याने ते जाणिवपूर्वक अशा गोष्टींकडे दूर्लक्ष करुन अवैध धंद्यांना एकप्रकारे प्रोत्साहन देत आहेत. साळवे यांच्याकडून गुन्हेगारांवर वचक निर्माण न होता त्यांना मदत होईल असे वातावरण तयार होताना दिसत आहे. त्यामुळे आजच्या सारखीच घटना वारंवार घडून पुन्हा एखाद्या युवकाचा बळी जाऊ शकतो. त्यामुळे तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत पोलीसांचा वचक व दरारा निर्माण करण्याकरिता पोलीस निरीक्षक साळवे यांचे तात्काळ निलंबन करुन त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष असा पोलीस अधिकारी नेमावा, अशी आम्ही याद्वारे मागणी करण्यात आली.