फेसबुक व इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून महिलेची बदनामी केल्याची घटना सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. हा प्रकार संबंधित महिलेच्या सुनेच्या भावाने केल्याचे निष्पन्न झाले.
सावेडी उपनगरातील पीडित महिलेने सोमवारी (दि. ५) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या सुनेच्या भावाविरूद्ध भादंवि ३५४ (ड) व माहिती तंत्रज्ञान अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २४ एप्रिल २०२३ ते १९ मे २०२३ दरम्यान घडली आहे. सावेडी उपनगरातील फिर्यादीच्या सुनेच्या भावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून त्यावर फिर्यादीचा संपर्क क्रमांक टाकला.
तसेच इंस्टाग्रामवरही फिर्यादीच्या नावे बनावट खाते तयार करून अश्लिल मजकूर टाकला. त्यावर फिर्यादीचा संपर्क क्रमांक नमूद केला. यामुळे फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर अनेकांनी अश्लिल मेसेज केले. फिर्यादीने सुरूवातीला सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर हा प्रकार नात्यातील व्यक्तीने केल्याचे समोर आले. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.