Thursday, May 9, 2024

अहमदनगर लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठक प्रशासनाचे दिले ‘हे’ आदेश

अहमदनगर, दि. 27 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निवडणूकीच्या अनुषंगाने खुप चांगली पूर्वतयारी केली आहे. आपण निवडणूकीच्या महत्वाच्या टप्प्यावर असुन ही निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत संवेदनशील पणे पार पाडाव्यात. निवडणुक प्रक्रियेत सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवत काम करण्याचे निर्देश 37-अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) रविकुमार अरोरा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत श्री अरोरा बोलत होते.

यावेळी 37- अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (खर्च) शक्ती सिंग, 38-शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) अजय कुमार बिष्ट, निवडणूक निरीक्षक (खर्च) ममता सिंग, निवडणूक निरीक्षक (पोलीस) एम. व्ही.जया गौरी, जिल्हाधिकारी तथा 37-अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी तथा 38-शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. अरोरा म्हणाले की, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने करावयाची सर्व प्रक्रीयेची पुर्वतयारी खुप चांगल्या प्रकारे केली आहे. परंतू केलेल्या पुर्वतयारीची प्रत्यक्षात योग्य अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आपण निवडणूकीच्या महत्वाच्या टप्प्यावर आहोत, त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षित करावे. भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून मतदानाच्या तारखेपर्यंत ती अधिक वाढणार आहे. त्यामुळे मतदारांना उन्हापासून संरक्षणासाठी शेड व्यवस्था, वैद्यकीय उपचार किट, मदत कक्ष पिण्‍याचे पाणी यासारख्या सुविधा सहायक निवडणूक अधिकारी यांनी आपल्या मतदार संघात आहेत का ? याची खात्री करुन घ्यावी. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा आहेत का? ज्या मतदान केंद्रावरुन वेबकास्टींग होणार आहे तेथील इंटरनेट सुविधा सुरळीत राहील याची काळजी

घ्यावी. तसेच दूरस्थसह इतर सर्व मतदान केंद्राची अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मार्गाची देखील तपासणी करावी. ज्या ठिकाणी त्रुटी आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. सी- व्हिजिल या ॲपवर येणाऱ्या तक्रारीचे तातडीने निवारण होईल याची काळजी घेण्यात यावी. निवडणुकीच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या परवानग्या सुविधा ॲपमधून देण्यात याव्यात. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेल्या सर्व ॲपचा पुरेपूर वापर करण्यात यावा. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मॉकपोलच्या वेळी पोलिंग एजंटना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एफएसटी, एसएसटी,व्हीएसटी या पथकांनी अधिक दक्षपणे काम करण्याच्या सूचनाही यावेळी निवडणूक निरिक्षक (सामान्य) श्री अरोरा यांनी उपस्थित नोडल अधिकाऱ्यांना दिल्या.

38- शिर्डी मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) अजय कुमार बिष्ट म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गठीत विविध पथकांनी अधिक कार्यक्षमपणे काम करावे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकसंघपणे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

निवडणूक निरीक्षक (खर्च) शक्ती सिंग व ममता सिंग यांनी निवडणूक कालावधीत मतदार संघात प्रसारीत होणाऱ्या राजकीय पेड न्यूज आणि राजकीय पुर्वप्रमाणिकरण न केलेल्या जाहिरातीं, तसेच सोशल मिडीयावरील जाहिरातीवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने (एमसीएमसी) लक्ष ठेवावे. तसेच संशयीत पेडन्युजवरही करडी नजर ठेवत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा प्रत्येक खर्च नोंद होईल यादृष्टीने सर्व पथकांची काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

38- शिर्डी मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक (पोलीस) एम. व्ही. जया गौरी म्हणाल्या की, निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने तयारी पुर्ण केली आहे. परंतु जे नियोजन केले आहे, त्याची योग्य अंमलबजावणी करावी. तसेच निवडणुक प्रक्रियेमेध्ये व्यत्यय आणणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. तसेच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सर्व प्रथम जिल्हाधिकारी तथा 37 – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दोनही लोकसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या तयारीची माहिती पॉवर पॉईंटच्या माध्यमातून दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली.

या बैठकीस सर्व सहायक निवडणुक अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, निवडणूक प्रक्रियेशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles