– राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा विजय झाला. त्यामुळे अहमदनगरमध्ये आज भाजपतर्फे राम शिंदे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी तुफान फटकेबाजी केली.
कर्डिले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी पाहिले की, राज्य सरकारमध्ये सन्मान मिळत नाही. त्यामुळे ते सन्मान मिळविण्यासाठी बाहेर पडले. 3 जुलैपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. मी काही हात पाहून भविष्य सांगत नाही. मी तोंड पाहून भविष्य सांगतो. राम शिंदे यांना फडणवीस विधानपरिषदेवर संधी देणारच होते म्हणून मी संधी साधून शिंदेंना विधानपरिषदेवर पाठविण्याचा ठराव मांडला होता. मला खात्री होती की राम शिंदे हे विधानपरिषदेवर आमदार होतील, असे गुपित त्यांनी सर्वांसमोर सांगतले.
आता मी आणखी एक भविष्यवाणी करतो. यात राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील मंत्री होतील. महिलांतून मोनिका राजळे मंत्री होतील. मात्र मला माजी ते माजीच ठेऊ नका. तसे केले तर तुम्हाला ठेवायचे की नाही याची शक्ती मी ठेऊन आहे. आमचे तुमच्यावर अतिक्रमण होणार नाही. आमदार बबनराव पाचपुते यांची तब्बेत चांगली नव्हती. ते आले तर त्यांच्याही मंत्रीपदाचा विचार करा, अशी कोपरखळीही कर्डिले यांनी मारली.






