राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या स्मरणार्थ नगरचे नामांतर ‘आनंदनगर’ करावे
जितो अहमदनगरची आग्रही मागणी, पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
नगर : अहमदनगर शहराच्या नामांतराची चर्चा सुरू असून नगरमधील जैन समाजाने नगरचे नाव आनंदनगर करावे अशी मागणी केली आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांची जन्मभूमी, तपोभूमी तसेच कर्मभूमी म्हणून नगरची संपूर्ण देशात ओळख आहे. आचार्यश्रींचे समाधीस्थळ असलेले आनंदधाम हे देशभरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मानवतेचा महान संदेश आचार्यश्रींनी दिला आहे, त्यामुळे नगरचे नामकरण आनंदनगर करणे अतिशय उचित होईल, असा आग्रह होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई मेलव्दारे निवेदन पाठविण्यात आले आहे. लवकरच नगरमधील जैन समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेवून आपली मागणी मांडणार असल्याची माहिती जितो अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा यांनी दिली.
अमित मुथा यांनी म्हटले आहे की, नगर शहरात जैन समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. शहराच्या जडणघडणीत, विकासात जैन समाजाने कायम योगदान दिले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.हे सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान आहेत. त्यांनी दिलेला मानवतेचा महान संदेश सर्वांच्याच परिचयाचा आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच नगरमध्ये जैन समाज बांधवांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलची उभारणी केली. याठिकाणी सर्वांना अतिशय सेवाभावी आरोग्य सेवा दिली जाते. याशिवाय आचार्यश्रींच्या प्रेरणेतून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. करोना काळातही त्यांच्याच शिकवणीनुसार जैन समाजाने भरीव योगदान दिले व सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले. आचार्यश्रींचा जन्मजयंती उत्सव सध्या साजरा होत आहे. त्यांची जन्मभूमी असलेले पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी हे गावही तीर्थक्षेत्र आहे. जैन धर्मियांचे धार्मिक परीक्षा बोर्डही नगरमध्ये आहे. याठिकाणी देशभरातील साधूसाध्वीजी येत असतात. आचार्यश्रींमुळे नगरला सकारात्मक उर्जेचे धार्मिक, अध्यात्मिक अनुष्ठान प्राप्त झालेले आहे. तत्कालिन केंद्र सरकारने आचार्यश्रींप्रती श्रध्दा व्यक्त करीत त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकिटही प्रकाशित केले होते. अशी सर्व पार्श्वभूमी असल्याने नगरचे नामकरण आनंदनगर करावे अशी समस्त जैन समाजाची आग्रहाची मागणी असल्याचे मुथा यांनी सांगितले.