नगर – नगर शहराच्या केडगाव उपनगर व कल्याण रोड परिसरात तसेच सीना नदी लगतच्या काही भागात सोमवारी (दि.14) रात्री जमीन हादरल्याने नागरिक भयभीत झाले होते. अनेक नागरिक घाबरून घराबाहेर रस्त्यावर आले होते. मात्र हे धक्के भूकंपाचे नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे. भारतीय हवामान खाते (आय.एम.डी.) तसेच नाशिक येथील मेरी या भूकंप मापन केंद्रात त्याबाबतची कुठलीही नोंद झालेली नाही, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे यांनी सांगितले. केडगाव उपनगरातील केडगाव इंडस्ट्रियल एरिया, मोहिनीनगर, शिक्षक कॉलनी तसेच नगर कल्याण रोड, सावेडीतील काही भागात सोमवारी (दि.14) रात्री भूकंप सदृश सौम्य धक्के जाणवले आहेत. खिडक्यांची तावदाने थरथरल्याने नागरिक भयभीत होऊन घरातून बाहेर पडून रस्त्यावर आले. अनेकांना एका मिनिटात चार ते पाच वेळा असे धक्के जाणवल्याचे काही नागरिकांनी सांगितले. अचानक दारे-खिडक्या हालू लागले आम्हाला भीती वाटली आणि म्हणून आम्ही सहकुटुंब घराच्या बाहेर येऊन थांबलो आहोत. अशा प्रतिक्रिया केडगाव येथील काही नागरिकांनी दिली आहे.
या अगोदर मागील आठवड्यात गुरुवारी (दि.10) रात्री राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी परिसरात असेच धक्के जाणवल्याने नागरिकांत एकच घबराट पसरली होती. या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे यांच्याशी संपर्क साधला असता भुकंपाबाबत भारतीय हवामान खाते (आय.एम.डी.) तसेच नाशिक येथील मेरी या भूकंप मापन केंद्रात कुठलीही नोंद झालेली नाही. त्यामुळे सदरील धक्के हे भूकंपाचे नसावेत असे त्यांनी सांगितले. मागील आठवड्यात राहुरी तालुक्यात काही भुवैज्ञानिकांनी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी या वर्षी पाऊस जास्त झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होत असून भूगर्भातील पाण्याच्या या हालचालींमुळे पाण्याचा दबाव जमिनीतील मोकळ्या पोकळीकडे जात असल्याने पोकळीतील हवा बाहेर पडत असल्याने अशा प्रकारचे हादरे बसले असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली होती. केडगाव परिसर आणि सीना नदी लगतच्या परिसरात सोमवारी (दि.14) रात्री जाणवलेले धक्के हा त्याचाच एक भाग असण्याची शक्यता आहे, किंवा के.के. रेंज परिसरात लष्कराचे युद्ध सरावा दरम्यात एखादी क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे ही हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. मात्र हे भूकंपाचे धक्के निश्चित नव्हते, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये असे आवाहन डॉ.बडदे यांनी केले आहे.