नगर : शहरातील बुरुडगाव रस्त्यावरील जागा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ मालकाच्या वारसदारांना ताबा देण्याची कारवाई शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. दोन्ही दिवस कारवाईस फारसा विरोध झाला नाही. सायंकाळी चंदन इस्टेट भागातील एका बंगल्याचे बांधकाम जेसीबी लावून पाडण्यात आले.
भोसले आखाड्यातील झोपडपट्टीचा प्रतीकात्मक ताबा वारसदारांना देण्यात आला. गुरुवारी एका मालमत्ताधारकाने विरोध केल्याने त्याच्या बंगल्याचे कुलूप तोडून प्रशासनाला ताबा द्यावा लागला.
प्रशासनाने अंतिम नोटिसा बजावलेल्या रहिवाशांनी आज स्वत:हून बंगले रिकामे करण्यास सुरुवात केली होती.
आठ मूळ जागामालकांचे एकूण ५० वारसदार आहेत. त्यातील बहुतांशी जणांना ताबा मिळाला आहे.
पुणे रस्त्यावरील शिल्पा गार्डन ते समोरील बाजूस असलेली चंदन इस्टेट, माणिकनगर, विनायकनगर, भोसले आखाडा भागातील आठ मूळ जागा मालकांना न्यायालयाच्या आदेशानुसार जागावाटप केले जात आहे. ४७ वर्षांपूर्वी हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते. त्यानंतर नागरी वस्ती वाढत गेली, तशी या वादग्रस्त जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊन वसाहती निर्माण झाल्या. आता ते तिथून विस्थापित झाले आहेत. जमीन खरेदी विक्रीचे व्यवहारही रद्द झाले आहेत.
एकूण १२.५ एकर जागेचे वाटप ५० वारसदारांमध्ये केले जात आहे तर या भागातील सुमारे २५० ते ३०० कुटुंब विस्थापित होत आहेत. यामधील सरकारी औद्याोगिक प्रशिक्षण संस्थेची २९ गुंठे जागा वाटपातून वगळली गेली आहे, तर तीन दिवसांपूर्वी न्यायालयाच्याच आदेशानुसार स्काय ब्रिज या इमारतीच्या जागेला स्थगिती दिली गेली आहे.