शाळेचं आरक्षण असताना रूग्णालयाची उभारणी… मनपाच्या निर्णयाविरोधात नगरविकास खात्याकडे तक्रार

0
380

महापालिकेने कोट्यवधी रुपयांची निविदा प्रसिध्द करून बुरूडगाव रस्ता येथे प्रस्तावित केलेल्या नवीन रुग्णालयाची उभारणी कायदेशीर अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. शाळेचे आरक्षण असतानाही त्या जागेवर रुग्णालयाची उभारणी केली जात असल्याची तक्रार लोक कार्य आणि लोकक्रांती दलाचे अध्यक्ष हेमंत ढगे यांनी नगर विकास विभागाकडे केली आहे. शासनाने याची दखल घेत महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा नियोजन मंडळामार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून बुरूडगाव रस्ता येथील महापालिकेच्या जागेत रुग्णालयाची उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया होऊन स्थायी समितीकडून निविदाही मंजूर करण्यात आली आहे. मात्र, ज्या जागेवर रुग्णालयाची उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे, त्या जागेवर प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे.

महापालिकेने रुग्णालयाची मंजुरी करताना त्या जागेवरील प्राथमिक शाळेचे आरक्षण शासनाकडून रद्द करून घेणे आवश्यक होते. महापालिकेने कुठल्याही नियमाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या शाळेचे आरक्षण असलेल्या जागेत रुग्णालयाची उभारणी करणे उचित नाही, असे ढगे यांनी म्हटले आहे.