नगर अर्बन बँकेला रिझर्व्ह बँकेकडून मोठा दिलासा
कॅश क्रेडिट, नजरगहाण कर्ज नूतनीकरणास परवानगी
नगर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नगर अर्बन को.ऑप.मल्टीस्टेट बँकेला मोठा दिलासा देत कॅश क्रेडीट कर्ज, नजरगहाण कर्ज व लघुउद्योग धंद्यांना दिलेले नजरगहाण कर्ज कर्जखात्यांचे व्याज भरून घेऊन नूतनीकरण करून घेण्यास परवानगी दिली आहे. 7 डिसेंबर 2021 पासून रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केले होते. मधल्या काळात कर्ज थकबाकी वसुली चांगल्या प्रकारे झाल्याने रिझर्व्ह बँकेने हा दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन अशोक कटारिया व मुख्य कार्यकारी अधिकारी एम.पी.साळवे यांनी दिली.
चेअरमन अशोक कटारिया यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधामुळे कॅशक्रेडीट, नजरगहाण कर्जाचे नूतनीकरण करता येत नव्हते. आता याबाबतचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. बँकेची कर्ज वसुली व एकूणच कामकाजात सकारात्मकता दिसल्यानेच रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. डीआयजीसीने निर्बंधानंतर बँकेत 5 लाखापर्यंत ठेवी असलेल्या खातेदारांना 295 कोटी रुपये अदा केले. यापोटी डीआयजीसीला बँकेकडून 60 कोटी रुपयांचा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत दिला जाणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाने व प्रशासनाने अथक प्रयत्न करून 13 महिन्यांत जवळपास 265 कोटी रुपयांची कर्ज थकबाकी वसुली केली आहे. बँकेची आजमितीस 395.45 कोटींची गुंतवणूक आहे. तर कॅश लिक्विडीटी 48.50 कोटी रुपये इतके आहे. आजमितीस बँकेला कर्ज व व्याजाची येणे बाकी 799.44 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे तीन वर्षानंतर बँकेने 3.27 कोटी रुपये इन्कम टॅक्सही भरला आहे. कर्ज नुतनीकरणास परवानगी मिळाल्याने कर्ज खातेदारांना फायदा होणार असून खराब सिबिल सुधारणा करण्यासाठी मदत होणार आहे.बँकेच्या सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. बँकेच्या थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असून ती अधिक गतिमान करण्याचे संचालक मंडळाचे धोरण आहे. त्यामुळे सदर कारवाई टाळण्यासाठी कर्जदारांनी बँकेला थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन व्हाईस चेअरमन सौ.दिप्ती गांधी तसेच संचालक मंडळाने व बँक प्रशासनाने केले आहे.






