भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे शिवसेना ठाकरे गटात आज प्रवेश करणार आहेत. साजन पाचपुते हे आज सायंकाळी पाच वाजता मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे राज्यात आणखी एका काका विरुद्ध पुतण्याची राजकीय लढत पाहायला मिळू शकते. कारण साजन पाचपुते यांना ठाकरे गटात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बबनराव पाचपुते यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडलेली पाहायला मिळत होती. त्याचा फटका आमदार पाचपुते यांना सरपंच पदाच्या निवडणुकीत बसला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली आणि साजन यांनी बहुमताने विजय मिळविला.