Ahmednagar news:‘शेअर मार्केट’चा बळी! युवकांची गळफास घेऊन आत्महत्या

0
16

युवकांची गळफास घेऊन आत्महत्या.

शेअर मार्केट : गुंतवणूकदारांच्या तगद्याला कंटाळून संपवले जीवन.

शेवगाव : तालुक्यातील कोळगाव येथील युवकाने राहत्या घराच्या शेजारील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना, सोमवारी सकाळी घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

रामदास सुखदेव झिरपे ( अंदाजे ३५ वर्षे ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत चे वृत असे की, रामदास झिरपे हे, त्यांच्या चुलत बंधू विठ्ठल याच्या मालकीच्या गावातील शेअर मार्केट कार्यालयात रामदास कर्मचारी म्हणून कार्यरत होता. संबंधित शेअर मार्केट कंपनी चालविणारा युवक हा गत काही महिन्यापासून फरार झाला असल्याने गुंतवणूकदारांनी रामदास झिरपे यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. तसेच संबंधित पसार झालेल्या त्यांच्या चुलत भावाचा ठावठिकाणा सांगावा, यासाठी विचारणा करीत होते. यासर्व गोष्टींना कंटाळून रामदास याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.
सोमवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाण्याची मोटर सुरु करण्यासाठी रामदास झिरपे यांचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर झिरपे हा उठले असता, घराच्या शेजारच्या लिंबाच्या झाडाला रामदास लटकलेल्या अवस्थेत दिसला. संबंधित घटना पोलिसांना कळविण्यात आल्यावर, पंचनामा करुन शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यावर सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आहे.
रामदास यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मयत रामदास याची मोठी मुलगी निता हीचा दहावीचा निकाल होता. दुपारी अंत्यविधी दरम्यान, ती ८३ टक्क्यांसह उत्तीर्ण झाल्याचे कळाले, मात्र ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी तिचे वडील या जगात नव्हते.
चौकट : तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणूकदारांना चुना लावून अनेक एजंट कोट्यावधी रुपयांची लूट करुन पसार झाले आहेत. त्यामुळे आर्थिक फसवणूक झालेल्या हजारो लोकांची चीता वाढली आहे. अश्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, तसेच पोलीस, नागरिकांच्या तक्रारी घेत नसल्याने, पोलीस प्रशासनाच्या भूमिके विषयी नागरिकांतून मोठा रोष व्यक्त होत आहे.