सत्तेत राहून आंदोलन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्टंटबाजीच : शहरप्रमुख संभाजी कदम
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर, विरोधी पक्ष नेता, नगरसेवक काम करत नाहीत का?
नगर – नगर महानगर पालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत आहे. त्यांचा उपमहापौरही आहे. विरोधी पक्ष नेता पदही अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. शहरातील समस्या, उपाययोजनांबाबत बैठक घेऊन जनतेसाठी कामे करायची असतात. तसे न करता स्वतः सत्तेत असताना कामे न करता आंदोलने करायची हा निव्वळ स्टंटबाजीचाच प्रकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक काम करत नाहीत का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय. या आंदोलनामागे काही वेगळा उद्देश आहे का, हे तपासणे गरजेचे आहे.
महानगरपालिकेत पदाधिकारी व प्रशासन समन्वयातून काम करत असतात. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या समस्यांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यातूनही अधिकारी काम करत नसतील तर त्यांना जाब विचारणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ निवेदन द्यायचे आणि प्रश्न सोडवण्यासाठी कुठलेही प्रयत्न न करता थेट आंदोलन करायचे ही स्टंटबाजीच म्हणावी लागेल. त्यातही आंदोलनात काही ठेकेदारही असल्याने आंदोलनामागचा उद्देशही तपासायला हवा.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. प्रत्येक नगरसेवक आपापल्या प्रभागात समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रशासनासमवेत बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देतात. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर आहेत. विरोधी पक्ष नेताही आहे. स्वतःचा पक्ष सत्तेत असतानाही निव्वळ आंदोलन करून स्टंटबाजी करणे म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या नगरसेवक व उपमहापौरांवर, विरोधी पक्ष नेत्यांवर विश्वास नाही, ते काम करत नाहीत, असा होतो. बहुधा राज्यातील सत्तेत भाजप समवेत गेल्यामुळे नगरमध्ये आपण मनपातील महाविकास आघाडीतून बाहेर पडून विरोधी पक्षात गेल्याचा त्यांचा समज झाला असावा.