ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनची महाराष्ट्र प्रदेश वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

0
312

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनची महाराष्ट्र प्रदेश वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
मोबाईल ब्रॅण्डस व विक्रेत्यांमधील दुवा बनण्याचे काम संघटना करणार

नगर: ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथे पार पडली. मोबाईल विक्री करताना येणार्‍या अडचणी, चीनी मोबाईल कंपन्यांचे अनुचित व्यापार धोरण, इ कॉमर्स कंपन्यांची स्पर्धा, केंद्र सरकारचे चुकीचे धोरण अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी सण उत्सव काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चीनी मोबाईल कंपन्यांनी मनमानी केल्यास तीव्र विरोध करण्याचा व संघटनेच्या माध्यमातून देशव्यापी लढा उभारण्याचा निर्णय या सभेत झाला. तसेच ऑनलाईनच्या स्पर्धेला तोंड देत व्यवसाय कसा वाढवायचा तसेच संघटना म्हणून मोबाईल ब्रॅण्ड व विक्रेत्यांमधील दुवा कसे बनायचे यावर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजित जगताप यांनी दिली.

असोसिएशनच्या या बैठकीस असोसिएशनचे राष्ट्रीय संस्थापक कैलास लख्यानी, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष विभूती प्रसाद, सरचिटणीस नवनीत पाठक, महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, सचिव जुजर धोराजिवाला, उपाध्यक्ष संजय विरवाणी, महेश चिंचोळी, संतोष बलदोटा यांच्यासह महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, राज्य पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

कैलास लख्यानी यांनी मोबाईल विक्रेत्यांना स्थानिक पातळीवर येणार्‌या अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत तसेच प्रत्येक जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
विभूत प्रसाद म्हणाले की, ऑनलाईन तसेच मॉडर्न ट्रेडमुळे प्रचंड अशी स्पर्धा निर्माण झाली आहे. असे असले तरी स्थानिक विक्रेते व ग्राहकांचे नाते कायम आहे. ती विश्वासार्हता आणखी वाढवून व्यवसाय वाढविला पाहिजे. नवनीत पाठक यांनी एमराच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत सदस्यांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

अजित जगताप यांनी सांगितले की, मोबाईल विक्री हा देशातील मोठी उलाढाल असलेला व्यवसाय आहे. देशभरात लाखो विक्रेते ग्राहकांना उत्तम सेवा देत व्यवसाय करतात. ग्राहकही आपल्या नजीकच्या व ओळखीच्या रिटेलरकडूनच मोबाईल घेण्यावर भर देतात. कारण स्थानिक विक्रेताच त्यांना विक्री पश्चात सेवा चांगल्या पध्दतीने देत असतो. अशा वेळी काही मोबाईल कंपन्या विशेषतः चीनी ब्रॅण्ड ई कॉमर्स कंपन्यांशी हातमिळवणी करून देशभरातील रिटेलर्सना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक भारतात व्यवसाय करताना केंद्र सरकारचे नियम पाळणे गरजेचे आहे. या नियमांची काही कंपन्या सर्रास पायमल्ली करतात. अशा वातावरणात सर्वांची एकजूट महत्वाची आहे. या वार्षिक सभेत उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यातील 15 सदस्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच सर्व सभासदांनाही प्रशस्तीपत्र देण्यात आले.