मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी आज त्यांच्या आयोध्या दौऱ्याची घोषणा केली. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेही आयोध्येला जाणार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता त्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आयोध्येला निघालेल्या राज ठाकरेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हटके स्टाईलनं टोलेबाजी केली आहे. ज्याला आयोध्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या, भारतात कोणी कुठेही जाऊ शकतो. त्याचा इतका बोभाटा करायचे काम नाही. आम्हीही शिर्डीला गेलो पण बोभाटा केला नाही. पण काहींना आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवतोय, असे दाखवायचे आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा झाल्यापासून पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध मनसे संघर्ष पेटला आहे. राष्ट्रवादीच्या उदयापासून जातीय राजकारण वाढल्याचा थेट आरोप राज ठाकरेंनी केला. तर त्याला राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.