महापालिकेसह जिल्ह्यातील चार नगरपालिकांना मंजूर करण्यात आलेल्या ३२ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने ही स्थगिती दिली आहे. याचा फटका प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदार, पदाधिकाऱ्यांना बसला आहे.
नगरविकास विभागाने १९ एप्रिल आणि २० मार्च २०२२, अशा दोन स्वतंत्र आदेशाने अहमदनगर महापालिकेसह जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव, जामखेड, पारनेर नगरपालिकांना विविध विकास कामांसाठी हा निधी मंजूर केला होता. यातील कार्यारंभ आदेश न दिल्याने ३२ कोटी रुपये खर्चाच्या कामांना आता स्थगिती देण्यात आली आहे.
मंजूर झालेला निधी रोखणे हे चुकीचे आहे. अहमदनगर शहराच्या विकास कामांसाठी हा निधी मंजूर झाला होता. त्याला रोखण्याची आवश्यकता नव्हती. तरीही आपण पुन्हा वाढीव निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली.






