कालपासून मनसेमधील नेते अगोदर अंबरनाथमध्ये आणि आज कल्याणमध्ये सरकारमधील मंत्रिपदाबाबत उलटसुलट विधाने करत असल्याने नक्की मनसेची सरकार मधील सहभागा विषयी भूमिका काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
युवा नेते अमित ठाकरे शनिवारी कल्याणमध्ये दाखल झाले. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होणार का? असा प्रश्न केला. त्या प्रश्नाला बगल देत अमित यांनी “मला राज साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल”असे मिश्कील शब्दात सांगत मनसेला शिंदे सरकारमध्ये स्थान मिळेल असे अप्रत्यक्ष सूचित केले. अमित यांनी अंबरनाथ दौऱ्यात मनसेला गृहमंत्रीपद मिळणार असेल तर या सरकारमध्ये सहभागी होऊ असे वक्तव्य केले होते. तोच धागा पकडून अमित यांनी कल्याणमध्ये सरकारमधील सहभागा बद्दल हसत हसत भाष्य केल्याने त्यांच्या या विधानाला विशेष महत्व आले आहे.