फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून मी कसा बसू? म्हणणारे आज त्याच देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसलेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. अरविंद सावंत हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी अमरावती येथे ‘मशाल यात्रे’दरम्यान आयोजित सभेत बोलताना शिंदे-फडणवीस सरकार जोरदार टीकास्र सोडले.
एकनाथ शिंदे यांनीच उद्धव ठाकरेंना २०१४ मध्ये भाजपाबरोबर सत्तास्थापन करण्याची मागणी केली होती. हे उद्धव ठाकरेंना तेंव्हाही मान्य नव्हतं. केवळ मिंधे लोकांसाठी त्यांनी पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीवेळी मी प्रचाराला व्यासपीठावर होतो. तेव्हा याच दाढीवाल्या बाबाने मोठी नाटकं केली होती, एक मोठा अर्ज लिहून आणला होता. ‘साहेब, आपल्या सामान्य माणसांची कामं होत नाहीत. गरिबांना न्या मिळत नाही. यांच्या मांडीला मांडी लावून मी कसा बसू? माझा राजीनामा घ्या’, असं ते म्हणाले होते. मात्र, तोच बाबा आज देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसला आहे”, असे ते म्हणाले.