ध्येयवादी लोक नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतात… अण्णा हजारेंनी केले फडणवीस यांचे कौतुक

0
21

राज्यात लोकायुक्त कायद्याचे विधेयक विधिमंडळात येत असल्याने यासाठी पाठपुरावा करीत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले. ते म्हणाले, ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर अनेक लोक बदलतात, मात्र काही ध्येयवादी लोक नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असतात.’ हे विधेयक आणत असल्याबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून अभिनंदन केल्याचेही हजारे यांनी सांगितले.
लोकपालच्या धर्तीवर राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्याची मागणी होती. यासाठी गेल्या बारा वर्षांपासून हजारे यांनी विविध आंदोलने केली. अखेर यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या त्यांचाच समावेश असलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला. या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येऊन हे विधेयक नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर हजारे यांनी आज राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी संवाद साधला.