पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो.माऊलींचा, विठुरायाचा नामघोष करत वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी वारीत सहभागी झाला आहे .घर, संसार, शेती, पाऊस सगळंच विठुरायाच्या विश्वासावर ठेवून वारकरी वारीत सहभागी होतो. याच वारीतील एका ८४ वर्षीय आज्जीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल वय हा फक्त एक आकडा असतो.
वय हा फक्त एक आकडा असतो. मन तरूण असेल तर म्हातारपणातही एवढा उत्साह निर्माण होतो. विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन दुपारच्या भर उन्हात पायाने धावा करत वारीचा टप्पा पार करणाऱ्या आज्जीबाईंचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर असणाऱ्या या आज्जी भर उन्हात ४३ सेल्सियस तापमानात अखंड चालत आहेत. या आज्जीबाईंचं वय ८४ वर्ष इतकं आहे. मात्र तरीही त्या जराही थकलेल्या दिसत नाहीयेत.