शिवसेनेत बंडखोरी झाल्यावर आता काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यात काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. या तर्कवितर्कं चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता स्वत: अशोक चव्हाण यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, “माध्यमांद्वारे सुरु असलेले वृत्त चुकीचे आणि विपर्यास आहे. राज्यात गणेशोत्सव काळात पक्षीय मतभेद विसरुन नेतेमंडळी एकमेकांकडे जात असतात. पक्षाच्या पलिकडे सर्वांचे संबंध असतात. माझी त्यांच्यासोबत थोडीच दुश्मनी आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,” असे चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.