ईश्वर चिंतनात फार मोठी ताकद आहे : ह.भ.प. अशोक महाराज ईलग शास्त्री.
बोधेगाव प्रतिनिधी : कोरोना सारख्या भयंकर आजाराने आपल्याला जगायला शिकवले. आपल्या आरोग्याचे महत्व दाखवून दिले. आपल्यातील अनेक माणसं एका क्षणात निघून गेली. अशा काळात ईश्वराने आपल्याला शिल्लक ठेवले त्यामुळे सर्वांनी ईश्वराचे चिंतन केले पाहिजे असे प्रतिपादन ह.भ.प. अशोक महाराज ईलग शास्त्री यांनी बोधेगाव येथे केले.
तालुक्यातील मौजे बोधेगाव मारुती वस्ती येथे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काल्याच्या कीर्तनप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ईलग शास्त्री म्हणाले की, ईश्वर चिंतनात फार ताकत आहे. ज्याला ग्रंथ आणि संत कळाले त्या एवढा भाग्यवान कोणी नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देऊळे सुरक्षित राहिले. शिवरायांचा इतिहास आज तरुणांनी वाचला पाहिजे व आपल्या जीवनात आत्मसात केला पाहिजे. चांगल्या मित्रांच्या संगतीत रहा. त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला योग्य वळण मिळते असेही ते बोलताना म्हणाले.
राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील दिग्गजांनी यावेळी हजेरी लावली होती.
– गावातील तरुणांनी एकत्र येत सप्ताहाचे आयोजन केले. यावेळी सर्वांनी १३ कोटी राम नामाचा जप करण्याचा संकल्प केला.






