औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. लग्नाच्या मुहूर्तावर लग्न कार्यास सुरवात झाली. पण याचवेळी वराच्या भावाने विष घेतलं आणि एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्याने उपचार घेण्यास नकार दिला. एवढच नाही तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना धक्काबुक्की करत रुग्णालयातून पळ काढला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील वऱ्हाणापूर येथील वऱ्हाड सोमवारी लग्नासाठी वैजापूर शहरातील भालेराव वस्तीवर आलं होतं. संपूर्ण मंडप सजला होता. वधू-वर लग्नाच्या पोशाखात लग्नासाठी उभे राहिले आणि लग्नकार्याला सुरवात झाली. एकीकडे लग्नाच्या विधी सुरु असतानाच दुसरीकडे नवराच्या भावाने विष घेतले. त्याला विष घेताना त्याच्या पत्नीने पाहिले आणि लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला.
लग्नात उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी विष घेणाऱ्या नवऱ्याच्या भावाला वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवले. पण तिथे गेल्यावर विष घेणाऱ्या व्यक्तीने डॉक्टरांना उपचार घेण्यासाठी नकार दिला. यावेळी त्याने डॉक्टरांना शिवीगाळ सुद्धा केली. पण सुरक्षारक्षक यांच्या मदतीने त्याच्यावर उपचार करण्यात आले.विषय घेणाऱ्या व्यक्तीवर डॉक्टरांनी उपचार केला. त्यांनतर दोन तासांनी तो शुद्धीवर आला. शुद्धीवर येताच त्याने पुन्हा गोंधळ घालायला सुरवात केली. हाताला लावण्यात आलेली सलाईन स्वतः काढून फेकली. त्यांनतर त्याला सुरक्षारक्षक अडवण्याच्या प्रयत्न करत असताना, त्यांना सुद्धा लाथ मारून हा व्यक्ती रुग्णालयातून पळून गेला. त्यामुळे नातेवाईक आणि डॉक्टरांनी डोक्याला हात मारून घेतला. सोबतच घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.