प्रहारचे आमदार माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याकडून होत असलेल्या आरोपांविषयी निर्वाणीचा इशारा दिला आहे. मला आठ आमदारांचा फोन आला होता, आमच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असं त्यांनी सांगितल्याचं बच्चू कडू म्हणाले. शिंदे साहेब म्हणायचे, आमचे पन्नास आमदार पडू देणार नाही, पडण्याचा विषयचं नाही, कधी उभं राहणार, असा प्रश्न निर्माण झालाय म्हणून हा प्रश्न कायमचा मिटला पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले. सत्तांतर होत राहतं. सत्तांतरानंतर चुकीचे आरोप लावले जातात. त्याच्यात कुठलाही तथ्य नसतं. विरोधक लावतो इथपर्यंत ठीक आहे. पण, जेव्हा आपला घरातला माणूस लावतोय हे फार चुकीचं आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
आमच्या प्रश्नावर मार्ग निघाला नाही तर वेगळा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातल्या लोकांच्या डोक्यात वेगळीच गोष्ट बसलीय, साधं वर्गणी मागायला गेलं की लोकं असं म्हणणार बरं तुम्ही तर पन्नास खोके घेतले. आपल्या घरातील माणूस आरोप लावत असेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे , असं बच्चू कडू म्हणाले






