मुंबई: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन आज त्यांना भेटलो. काल पोलीस आयुक्त संजय पांडेंनाही भेटलो होतो. तसेच ज्वॉईंट कमिश्नर वारकेंना भेटलो. तीनचार दिवसापूर्वी लालबागला माझ्या कार्यालयात मला धमकीचं पत्रं आलं होतं. भोंग्याचा विषय झाल्यापासून आम्हाला धमक्या सुरू आहेत. त्यापैकीच हे एक पत्रं, या पत्रातून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राज ठाकरेंनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्या संदर्भातच गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. तसेच बाळा नांदगावकरचं जाऊ द्या. पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल, असा इशाराही नांदगावकर यांनी दिला. हे पत्रं हिंदीत असून त्यात उर्दूचेही काही शब्द आहे. भोंगे आंदोलनाच्या अनुषंगाने ही धमकी देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.






