दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन असून यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट-भाजपा आमने-सामने आहेत. स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी एक मोठी मागणी केली असून हे स्मृतीस्थळ सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे असा सल्ला दिला आहे. दरम्यान त्यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
“वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक कोणत्याही एका कुटुंबाचं होऊ शकत नाही. महाराष्ट्रासाठी गौरव असलेलं हे स्मारक महाराष्ट्र शासनाने आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे, अशी मी सरकारकडे मागणी करत आहे,” असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. तसंच देखभालीसाठी समिती स्थापून त्यात ठाकरे कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची नेमणूक करावी, असा सल्लाही त्यांनीही दिला आहे.






