बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळीच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये आगमन झाले. शासकीय बैठकीआधी पवार यांनी पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बीड कोणी कुठल्या गोष्टीसाठी जबाबदार असेल, जर कोणी वेडेवाकडे प्रकार करणार असेल किंवा कोणी विकासकामांच्या आड येत असेल तर मी ते खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास अशा लोकांवर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. जिथे तथ्य असेल तिथे कारवाई केली जाईल, पण जिथे तथ्य नसेल त्या वेळी कारवाई केली जाणार नाही, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.
मी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते, याठिकाणी चांगले अधिकारी पाहिजेत. मी आता बीडमधील अधिकाऱ्यांकडे बघणार आहे. काही अधिकारी बरीच वर्षे याठिकाणी आहेत. मी त्यामध्ये दुरुस्ती करणार आहे. मी काम करताना भेदभाव करत नाही. बीड कष्टकरी समाज मोठ्याप्रमाणावर राहतो. मी काम करताना जातीपाती नात्यागोत्याचा विचार केलेला नाही. बीड जिल्ह्यात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे. जिल्ह्यात चुकीच्या गोष्टी पूर्वापार चालत आल्या असतील तर त्याला आळा घातला पाहिजे. मी बीडमधील काही लोकांचे रिव्हॉल्व्हर हवेत उंचावून, कंबरेला लावून फिरतानाचे रील सोशल मीडियावर पाहिले आहेत. पुन्हा अशा गोष्टी दिसल्या तर खपवून घेतले जाणार नाही, संबंधितांचे लायसन्स रद्द केले जाील. मी सगळ्यांना सारखा नियम लावणार. बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे, तो मला आणि नागरिकांना जाणवला पाहिजे, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. यावेळी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा अजित पवार यांच्या सोबत होते.






