राज्यातील सत्ताधारी युतीचे घटक पक्ष भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यावर नाेंदलेला गुन्हा आणि मतदारसंघप्रमुखांची नेमणूक ही दुराव्याची कारणे ठरली आहेत. यातून भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे पिता-पुत्रावर बहिष्कार घातला आहे.
मागच्या आठवड्यात राज्यातील २५ ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्या करताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात एकमत झाले नाही. परिणामी शिंदेंनी आपल्या मर्जीप्रमाणे काही बदल्या केल्या. महसूल आणि नगरविकासच्या बदल्यांमध्ये फडणवीसांनी हस्तक्षेप करत आपल्या मर्जीचे अधिकारी आणले. एमएमआरडीए आयुक्त नेमण्यावरून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणाची भर पडली आहे.
कल्याण या ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत खासदार आहेत. तेथील भाजपचे डोंबिवली पूर्व विभागाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. हा गुन्हा मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून आलेल्या दबावामुळे झाल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. गुन्हा नोंदवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करेपर्यंत कल्याणमध्ये सेनेच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालायचा असा निर्णय भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.






