राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख केल्यामुळे महायुतीत खटके उडू लागल्याचं समजत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणं हा आततायीपणा आहे, असं विधान गिरीश महाजनांनी केलं. ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गिरीश महाजन म्हणाले, “मला वाटतं की, हा आततायीपणा आहे. असं कुणीही करू नये. आज आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आधीच सांगितलं की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही २०२४ च्या निवडणुका लढवणार आहोत. त्यामुळे असे काहीतरी विषय काढून विनाकारण काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये.”