शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहोत, पण काय बोललो हे माध्यमांना सांगणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी विस्तृत बोलणं टाळलं. शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादावर मात्र त्यांनी भाष्य केलं आहे.
पंकजा मुंडे चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचाराला आल्या होत्या, तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो हा मोठा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. सत्तेत असल्याने आपल्यासोबत असलेल्यांना भविष्यात निवडून आणणं ही मोठी संधी शिंदे यांच्याकडे आहे, तर दुसरीकडे नाव नसताना पुन्हा आपला पक्ष उभा करणं ठाकरे यांच्यासमोरचा प्रश्न आहे. पुढे काय घडतं याचं कुतूहल आपल्याला आहे,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.