अहमदनगर शहरातील पटवर्धन चौकात आमदार मिटकरी यांच्या पुतळ्याचे दहन
नगर- )इस्लामपूर इथं जाहीर सभेत ब्राह्मण समाजाबद्दल व पुरोहितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाजाची खिल्ली उडवली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मिटकरी यांना हसून दाद दिली. या प्रोत्साहनासह आमदार मिटकरींचा जिल्हा पुरोहित मंडळ व स्वातंत्र्यवीर सावरकर उत्सव समितीने निषेध केला आहे. अहमदनगर शहरातील पटवर्धन चौकात आमदार मिटकरी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून मिटकरी, पाटील व मुंडे यांच्या मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. मयूर जोशी, किशोर जोशी, अक्षय चिंधाडे, नरेंद्र खिस्ती, उपेंद्र खिस्ती, अमोल मोकाशी, प्रसाद पांडव, नीलेश धर्माधिकारी, सोमनाथ मुळे, सागर गोवर्धन, पराग दीक्षित, लक्ष्मीकांत कुलकर्णी, मकरंद भट, आशुतोष रेखी, दिलीप मांडे आदी उपस्थित होते.
सकल ब्राह्मण समाजातर्फे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळास पाठिंबा देत उपस्थिती लावली. त्यांनी जाहिरपणे आमदार मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. ब्राह्मण समाजाची केलेली चेष्टा उचित नसल्याचे त्यांनी सांगितले.
व्हिडिओ by विक्रम बनकर