राज्यात नवं राजकीय समीकरण राज ठाकरे, फडणवीस आणि शिंदे येणार एकत्र!

0
598

21 ऑक्टोबर, 2022

माझ्या शिवाजीपार्क शेजाऱ्यांनो

तसेच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो,

दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष करोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय. दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच ‘दीपोत्सव’ हे गेल्या 10 वर्षांपासून जणू समीकरणच बनलं आहे. दरवर्षी आपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या 2 वर्षांत सुध्दा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे. दीपावलीच्या निमित्ताने आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो. दादर मधील हा शिवतीर्थाचा परिसर, हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला तर महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा होईल. हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे. वसुबारसेपासून, 21 ऑक्टोबर 2022 पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत, 8 नोव्हेबंर 2022 पर्यंत, हा दीपोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी वसुबारसेला म्हणजे 21 ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन या. मित्र मंडळींना सांगा. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा. आपल्या सर्वांचा, राज ठाकरे