म्हणून आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडले… मुख्यमंत्री शिंदे यांनी केला गौप्यस्फोट!

0
45

नागपूर : माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावून तर देवेंद्र फडणवीस यांना खोटय़ा प्रकरणात अडकवून संपविण्याचा घाट घातल्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार पाडल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. तसेच प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुखांचे विचार विकणारेच आता लिंबू-टींबूची भाषा करताहेत. त्यामुळे चूक मान्य करून सत्याला सामोरे जा आणि राज्यातील जनतेची माफी मागा असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

विधानसभेत विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी आपल्या भाषणात सरकारच्या सहा महिन्यांतील कामगिरीचा आढावा मांडताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्ला चढविला.
बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम आम्ही करीत आहोत, त्यामुळे रेशीमबागेत गेलो. तुमच्यासारखे गोविंद बागेत (शरद पवार यांचे बारामतीमधील निवासस्थान) गेलो नाही, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून लगावला. घरातून बाहेरही न पडणाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा करणे, हा मोठा विनोद आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

महापुरुषांचा सन्मान करण्यास कुणाकडून शिकण्याची गरज नसल्याचे सांगत ‘‘छत्रपतींच्या वारसदाराकडे वंशज असल्याचे पुरावे कोणी मागितले? संभाजीराजांकडे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी प्रतिज्ञापत्र कोणी मागितले, छत्रपतींना जाणता राजा म्हणूू नका, असे कोणी सांगितले? अशी विचारणा करीत शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ‘ज्यांचे गृहमंत्री तुरुंगामध्ये गेले, दाऊदशी संबंध असलेला मंत्री तुरुंगामध्ये गेला, त्यांनी आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारू नये, असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला. सत्तेवर आल्यापासून हे सरकार पडेल, असा दावा विरोधक करीत आहेत. पण हे सरकार आपला कालावधी भक्कमपणे पूर्ण करेल. तसेच येणाऱ्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती बहुमताने जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.