उत्तर प्रदेश राज्यात साईबाबांच्या मूर्ती मंदिरातून हटविण्यात आल्याने हिंदू-मुस्लीम भाविकांकडून निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील शिर्डी येथे साईबाबांचे जगप्रसिद्ध मंदिर आहे, जगभरातून भाविक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.वाराणसी येथे सनातन सरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मंदिरातील साईबाबांचा फोटो आणि मूर्ती हटवल्याने नविन वाद उफाळुन आलाय. त्यानंतर, तेथे जवळपास 18 हून अधिक मंदिरातील साईबाबांची मूर्ती हटवण्यात आलीय. साईबाबा जाती धर्माच्या पलीकडचे देव आहेत, मूर्ती हटविण्याची ही घटना दुर्दैवी असल्याचं कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. शिर्डीचे साईबाबा कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. साईदर्शनाने लोकांना आत्मिक शांती लाभते. साई मंदिरात धर्मनिरपेक्षता असून साईबाबा जाती धर्माच्या पलीकडचे देव असल्याचे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. काही ठिकाणी मूर्ती हटवण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून हा धर्माचा अतिरेक आहे. काही लोकांना चातुवर्ण आणि मनुस्मृती पुन्हा आणायची आहे. साईबाबा म्हणजे राज्यघटनेला अपेक्षित देव आहेत. हिंदू असणे वेगळे आणि हिंदुत्ववादी असणे हे वेगळं आहे. देशाला पुन्हा अंधार युगाकडे नेण्याचा हा प्रयत्न चालल्याचं थोरात यांनी म्हटलं.






