पहाटेचा शपथविधी… फडणवीस यांचा गौप्यस्फोट… म्हणाले राष्ट्रवादीचीच ऑफर होती, स्वतः शरद पवारांशी सगळं ठरलं होतं..

0
34

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधी विषयी मोठा खुलासा केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा सुरु होती. ती चर्चा पुढे जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. याचदरम्यान आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला.
उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे.”