रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर बुधवारी रात्री काळाने घाला घातला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. रात्रीतून दरड कोसळली आणि 16 जणांनी जीव गमावला. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 जुलै असणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाबद्दल कोणीही होर्डिंग बॅनर लावू नये तसेच जाहिरातीदेखील देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याबाबत सांगितले. दोन्ही नेत्यांचा वाढदिवस 22 जुलैलाच असतो.