खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद जगजाहीर आहे. दोघेही सातत्याने एकमेकांना लक्ष्य करत असतात. अनेकदा हे वाद गंभीर असतात. बुधवारी (२१ जून) सकाळीच या दोघांमधल्या वादाचं असंच एक रुप साताऱ्याच्या खिंदवाडी गावात पाहायला मिळालं. एका जमिनीच्या तुकड्यावरून दोन्ही नेते आमने-सामने आले. त्यानंतर दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. दरम्यान, या वादानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राजेंची भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीसांना या भेटीचा तपशील विचारला. तसेच दोन्ही राजेंशी काय चर्चा झाली असा प्रश्न विचारला. यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, दोघांशीही विविध प्रश्नांवर माझी चर्चा झाली. इथले काही सिंचनाचे प्रश्न आहेत त्यावर चर्चा केली. यासंबंधी त्यांनी मला काही निवेदनं दिली आहेत. तसेच विकासकामांवरही चर्चा झाली देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही राजेंना जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. मला असं वाटतं की, अशा गोष्टी कधीकधी होत असतात. परंतु तिथे काहीतरी गंभीर घडतंय असं काही नाही. किंवा कुठलीही अडचणीची गोष्ट नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राजेंबरोबर दोन तास चर्चा केली. त्यानंतर उदयनराजेंबरोबर तासभर चर्चा केली. ही चर्चा केवळ विकासकामांबाबत होती असं फडणवीस यांनी भेटीनंतर स्पष्ट केलं