हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई आणि साथीदारांना अटक करण्यात आली आहे. जमीन नावावर करुन देण्यास नकार दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुळशीतील दारवली गावातील ही घटना असून याप्रकरणी प्रदीप शिवाजी बलकवडे (वय 35, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. धनंजय देसाई आणि साथीदारांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी धनंजय देसाई याच्यासह रमेश जायभाय, श्याम सावंत आणि 10 ते 15 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड परिसरातील दारवली गावात बलकवडे कुटुंबीय राहायला आहेत. ते सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले होते. त्यावेळी देसाईचे साथीदार घरात शिरले. देसाई यांच्या नावावर जमीन का करुन दिली नाही, अशी विचारणा करुन त्यांना धमकावले.
जमीन नावावर करुन दिली नाही तर तुझ्यासह कुटुंबीयांना ठार मारु, अशी धमकी दिली होती. बलकवडे यांना आरोपी श्याम सावंतने पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली. आरोपींकडे काठ्या आणि मारहाण करण्यासाठी लागणारं साहित्य होतं, असे बलकवडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.






