अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडावर आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मागील दीड महिन्यापासून धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेले आरोप आणि त्यांच्या राजीनाम्याची होणारी मागणी यामुळे धनंजय मुंडे यांच्या भगवान गड भेटीला विशेष महत्त्व आहे. काल गुरुवारी (दि. 31) भगवान गडावर आल्यानंतर त्यांनी संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन, महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली आहे. यानंतर आज नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे दिसून आले.
नामदेव शास्त्री महाराज पत्रकार परिषदेत म्हणाले की, धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणूनबुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदायाचे नुकसान आहे.
भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेतली नाही? मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे. पक्षाच्या नेत्यांना देखील याची जाणीव आहे की मुंडे गुन्हेगार नाही. धनंजय मुंडे यांच्या हातात सलाईन आहे त्यांनी किती सोसावे, असेही नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटले.