शरद पवारांना सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडे म्हणाले….

0
32

शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? ईडी, सीबीआयच्या नोटीसांमुळे भाजपाबरोबर गेलात का? या प्रश्नांवर धनंजय मुंडे म्हणाले, “शरद पवार हे आमचा आधार आणि दैवत आहेत. पण, भाजपाचा आधार घेणं किंवा बरोबर जाणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घेतलेली भूमिका आहे. ५ जुलै रोजी झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.”
“ईडी, इन्कम टॅक्सच्या नोटीसा आज नाहीतर, गेल्या अनेक वर्षापासून आल्या आहेत. मात्र, याच्या भीतीने आम्ही भाजपाबरोबर गेलो, हे लोकांमध्ये पसरवलं जातं. राष्ट्रवादीच्या उभारणीत स्वाभीमान हा विषय होता. हा पक्ष लोकशाही मानणार आहे. आमच्यासाठी दैवत आणि आधारस्तंभ शरद पवारच आहेत. लोकप्रतिनिधींची कामे आणि मतदारसंघाचा विकास होणे याला आमदार म्हणून आम्ही उत्तरदायीत्व आहे,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
तुम्ही दैवताला देवाऱ्यातून बाहेर काढलं आणि देवाऱ्यावर अर्थात पक्ष, चिन्हावर दावा केला, असे विचारल्यावर धनंजय मुंडे यांनी म्हटलं, “देव देवाऱ्यात आणि मनात आहे. देवाऱ्यात जाऊन पूजा करू नका, हे देवाने सांगितलं, तरी भक्त देवाचं मंदिर मनात करून पूजा करत असतो.”