अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला
येत्या ८ दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास मनपाच्या आवारात कचरा आणून टाकू – माजी उपमहापौर गणेश भोसले
नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वत्र कच-याचे ढिग दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासुन घंटा गाड्या कच-याचे संकलन करण्यासाठी येत नसल्यामुळे नागरीक आपला कचरा सर्रासपणे रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत, चौका-चौकात आणून टाकत आहेत. दिवसभरात प्रभागातील सुमारे १०० नागरीक कच-याच्या प्रश्नासंदर्भात माझ्याकडे फोनद्वारे तक्रारी करत आहेत. नागरिकांच्या तक्रारीकडे मनपाचे दुर्लक्ष होत असून त्यांना याचे काही देणेघेणे नाही शहरात कच-यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे मनपाच्या मुख्य प्रशासकीय आवारातच कचऱ्याचा ढीग पाहायला मिळत असून शहरात काय परिस्थिती निर्माण झाली असेल याची प्रशासनाने पाहणी करावी तसेच तरी मनपा प्रशासनाने येत्या आठ दिवसांमध्ये कचरा उचलण्याचे व स्वच्छतेचे नियोजन करावे अन्यथा महापालिकेच्या आवारात कचरा आणून टाकण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी निवेदनाव्दारे दिला






