नगर जिल्ह्यात पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या, ४ पोलिस निरीक्षकांना पदोन्नती!

0
28

राज्यातील 151 उपअधीक्षक व सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांसह 143 अधिकार्‍यांची पदोन्नतीने पदस्थापना केली आहे. जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, शेवगाव, नगर ग्रामीण, कर्जत, गृह शाखा, लाचलुचपत विभाग, जात पडताळणी समिती या ठिकाणी नवे पोलीस उपअधीक्षक मिळाले असून जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले चार पोलीस निरीक्षक यांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

गेल्या मोठ्या कालावधीपासून ‘प्रभारीराज’ असलेल्या संगमनेर उपविभागाला आता सोमनाथ वाघचौरेंच्या रूपाने उपविभागीय अधिकारी लाभले असून यापूर्वी त्यांनी जिल्ह्यात तीन वर्ष सेवा बजावली आहे. ते भुसावळ (जि. जळगाव) उपविभाग येथून बदलून आले आहेत. श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची शिर्डी येथे बदली झाली असून त्यांच्या जागी आनंदा वाघ यांना पदोन्नतीने पदस्थापना मिळाली आहे. वाघ हे नाशिक येथे पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत होते. तर शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांची शेवगाव येथे बदली झाली आहे.

नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांची करमळा (जि. सोलापूर) येथे बदली झाली असून त्यांच्या जागी अंबड (जि. जालना) येथून सुनील पाटील बदलून आले आहेत. कर्जत विभागाचे उपअधीक्षक अण्णसाहेब जाधव यांची सांगली शहरात बदली झाली आहे. त्यांच्या जागी विवेकानंद वखारे हे हिंगोली ग्रामीण येथून बदलून आले आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणी विभागात कार्यरत असलेल्या सुनील भामरे यांचीही नाशिक ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांची मुंबई येथे बदली झाली असून त्यांच्या जागी प्रविणचंद लोखंडे आले आहेत.

जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. सध्या जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले संपत शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून पदस्थापना मिळाली आहे. याशिवाय अनैतिक मानवी वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर यांना गृह विभागाच्या उपअधीक्षकपदी पदस्थापना देण्यात आली आहे. ते येत्या 31 मे रोजी निवृत्त होणार असल्याने पुन्हा ही जागा रिक्त राहणार आहे. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांना सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर व पोलीस निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांना पोलीस उपअधीक्षक मुख्यालय, नाशिक येथे पदस्थापना देण्यात आली आहे.