तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी उद्योजक सौरभ बोरा यांची फेर निवड झाल्याबद्दल शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरच्यावतीने सत्कार
सौरभ बोरा यांचे धार्मिक -सामाजिक कार्यातील योगदान वाखण्याजोगे – अॅड.अभय आगरकर
नगर – जगविख्यात देवस्थान म्हणून ख्याती असलेले श्री बालाजी देवस्थान हे देशासह विदेशी भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. नगरमधील अनेक भक्तही तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी नियमित जात असतात. तिरुपती बालाजी या देवस्थानाने भाविकांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचबरोबर देवस्थान हॉस्पिटल, शैक्षणिक संकुल सारख्या सामाजिक भावनेतून सेवा देत आहेत. अशा विख्यात देवस्थानच्या सदस्यपदी नगरचे उद्योजक सौरभ बोरा यांची फेर निवड ही नगरकराच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. मागिल कारकिर्दीत श्री.सौरभ बोरा यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने अनेक धार्मिक व समाजोन्नत्तीचे उपक्रमात सक्रिय सहभाग देत भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्यांच्या सत्कार्यामुळेच त्यांची पुन्हा सदस्यपदी निवड झाली. त्यांचे धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील योगदान हे वाखणण्याजोगे आहे. अनेकांना मदतीचा हात देत सुरु असलेल्या त्यांच्या कार्यास श्री विशाल गणेशाचे आशिर्वाद राहतील, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले.
तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी उद्योजक सौरभ बोरा यांची फेर निवड झाल्याबद्दल शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, प्रा.माणिकराव विधाते, नितीन पुंड, मर्चंटस् प्रमिला बोरा, निलिमा गांधी, राखी बोरा, तनिष बोरा, गौतम बोरा, सुवेंद्र गांधी, किशोर बोरा, प्रशांत मुथा, सचिन पारखी, मनिष मुंदडा, कमलेश भंडारी, किरण राका, अभिजित कोठारी, सुमित देवतरसे, निखिल गांधी, नाना जवरे, राजु एकाडे आदि उपस्थित होते. प्रारंभी श्री. सौरभ बोरा यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
सत्कारास उत्तर देतांना सौरभ बोरा म्हणाले, नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर हे सर्वांचे मोठे श्रद्धास्थान आहे. आपणही नियमित या ठिकाणी दर्शनास येतो. प्रत्येक देवस्थान ही आपली शक्तीस्थाने आहेत. या देवस्थांनांचा विकास झाला पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. बालाजी देवस्थानच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबरच विविध सामाजिक, आरोग्यदायी उपयोग राबविले जात आहे. भाविकांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून येथील सर्वजण काम करत आहेत. आपल्या चांगल्या योगदानाची दखल घेत पुन्हा निवड होणे हे श्री विशाल गणेशाचेच आशिर्वाद आहेत. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून चांगले काम करु, असे सांगून बालाजी देवस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी अशोकराव कानडे यांनी सौरभ बोरा यांच्या कार्याचा उल्लेख केला. सूत्रसंचालन प्रा.माणिकराव विधाते यांनी केले तर नितीन पुंड यांनी आभार मानले.