शिवसेनेचे दोन गट पडल्यापासून ठाकरे गटातून गळती सुरू आहे. ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सातत्याने शिंदे गटात प्रवेश सुरू आहेत. गेल्या महिन्यात विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला. त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला.
दरम्यान, आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. औरंगाबादच्या (जुनं नाव) माजी महापौरांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या नव्या साथीदारांचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षात स्वागत केलं.
#छत्रपती_संभाजीनगर महानगरपालिकेचे उबाठा गटाचे माजी महापौर गजानन बारवाल, माजी शाखाप्रमुख सतीश माहोरे, विभागप्रमुख कन्हैया देवतवाल, गुड्डू बसनीवाल यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा… pic.twitter.com/ITWJvOASiA
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 18, 2023






