माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे- प्रणिती शिंदे भाजपमध्ये ! चंद्रकांत पाटील शिंदेंच्या भेटीला

0
21

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला आणि आपली मुलगी प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा दावा आज सकाळी केला होता. याबाबतची चर्चा होऊन काही तास उलटत नाही तो भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे शिंदेंच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीला पोहचले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्याला आलेल्या भाजप प्रवेशाच्या ऑफरबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तर, शिंदे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच असल्याचे भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले आहेत. काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला भाजपची ऑफर आल्याने साहजिकच याचे परिणाम राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. यावरून सकाळपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. असे असतानाच सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील दाखल झाले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पोहचले असून, दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. तसेच, त्यांच्यात चर्चा देखील होत आहे.