मुंबई: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्यात जमा आहे. दिल्लीत काल रात्री उशिरा केंद्रीय मंत्री अमित शहांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर नेते महाराष्ट्रात परतले.
भाजप सर्वाधिक २८ ते ३२ जागा लढवेल. तर शिवसेना १२ ते १५, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ ते ६ जागा सोडल्या जाऊ शकतात. मनसे सोबत आल्यास त्यांच्यासाठी १ जागा सोडली जाऊ शकते. शिंदेंसोबत सध्या १३ खासदार आहेत. माझ्या १३ खासदारांची तिकिटं कापू नका, त्यांच्या जागा शिवसेनेसाठी सोडा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली होती. त्यावेळी शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते.
शिंदेंच्या १३ खासदारांपैकी ४ जणांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. शिंदेंचे ४ खासदार डेंजर झोनमध्ये असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. हिंगोली, यवतमाळ-वाशिम, शिर्डी, कोल्हापुरात नव्या चेहऱ्यांना संधी द्या. तरच तिथे निभाव लागेल, अशा सूचना भाजपकडून करण्यात आल्या आहेत. या माहितीला सेनेच्या माजी मंत्र्यानं दुजोरा दिला आहे. ‘इंडिया टुडे’नं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.






