नेत्यांमुळे कार्यकर्त्यांची गोची..राजकीय घडामोडींना वैतागून समर्थकाने भर चौकात ‎वाहनांवर गोफणीने वार

0
35

राष्ट्रवादी काँग्रेसमधील‎ बंडखोरीमुळे राज्याचे राजकारण ‎ चांगलेच तापले आहे. मात्र, वरिष्ठ ‎नेत्यांच्या राजकारणात खालच्या ‎कार्यकर्त्यांची चांगलीच गोची‎ झालीय. हीच गोष्ट तालुक्यातील‎ एका राजकीय पक्षाच्या समर्थकाला ‎काही पटली नाही. त्याचा सारा राग ‎त्याने भर चौकात व्यक्त केला. तेही ‎हातात थेट गोफण घेऊनच..‎ महाराष्ट्रातील राजकीय‎ घडामोडी पचनी न पडल्याने एका ‎राजकीय पक्षाच्या समर्थकाने‎ मद्यधुंद अवस्थेत भर चौकात ‎वाहनांवर गोफणीने वार करीत‎ सुमारे अर्धा तास गोंधळ घातला.

अनेक वाहनांना अडवून चालकांना ‎शिवीगाळ करीत त्याने हातातील पंचामध्ये दगड बांधून रस्त्याने‎ येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर वार‎ केले. ‘अन्य पक्षातील फुटीर‎ नेत्यांना मंत्रीपदे का बहाल करता’,‎ असा संतप्त सवाल भाजपला‎ करीत या तरुणाने जोरदार गोंधळ‎ घातला. हा तरुण दारूच्या नशेत‎ असला, तरी त्याला गेल्या‎ चार-पाच दिवसांपासून सुरू‎ असलेले राजकीय संदर्भ व‎ घडामोडी अचूक माहिती होत्या.‎

एका ट्रकच्या बोनेटवर दगडाचा‎ फटका बसला, मात्र सुदैवाने मोठे‎ नुकसान झाले नाही. मद्यपीचा‎ अवतार पाहून इतर वाहनचालकांनी‎ लांबच राहणे पसंत केले. त्यामुळे‎‎ काही काळ चौक पूर्णपणे बंद‎ झाल्यासारखे वातावरण झाले होते.‎

दरम्यान, हा सर्व प्रकार तेथे‎ ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक‎ पोलीसाच्या लक्षात आला.‎ परिस्थिती हाताबाहेर जाण्याची‎ शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी‎ मद्यपीला चौकातून बाजूला घेतले.‎ त्याच्या हातातून गोफणीसारखा‎ केलेला पंचा व त्यात बांधलेला‎ दगड हिसकाहून घेतला. हा प्रकार‎ पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी‎ झाली होती. रस्त्यावरील‎ वाहनचालकांना मात्र या प्रकाराचा‎ नाहक मनस्ताप सहन करावा‎ लागला.‎