ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आश्चर्य… उमेदवारांने ऐकले खराटा अन्‌ केला प्रचार; मतदानाच्‍या दिवशी खराटा चिन्हच गायब…..

0
25

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत धक्कादायक प्रकार समोर आलाय. उमेदवाराने प्रचार केला खराटा चिन्हावर आणि मतदानादिवशी ईव्हीएम मशीनवर चित्र आले खटारा. या प्रकाराने संबंधित उमेदवाराने संताप व्यक्त करत तहसीलदारांकडे निवडणूक परत घेण्याची मागणी केलीय.

राज्यभरातील जवळपास सात हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. अमरावती जिल्ह्यात देखील 257 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. परंतु, यावेळी अमरावतीच्या मेळघाटात मात्र चिन्ह दिलं एक अन् आलं दुसरं असाच प्रकार घडलाय. परंतु, या गोंधळाची आता राज्यभर चर्चा सुरू आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत कुठल्याच राजकीय पक्षाचे चिन्ह वापरले जात नाही. परंतु, सरपंच पदाच्या उमेदवाराने स्वतःचे चिन्ह सोडून चक्क आप पक्षाच्या झाडू चिन्हावर प्रचार केला. परंतु, मतदानाच्या दिवशी त्याला बॅलेटवर खराटा सोडून खटारा चिन्ह दिसले. हा प्रकार लक्षात येताच त्याच्यासह संपूर्ण गावच आश्चर्य व्यक्त करत आहे.

चिखलदरा तालुक्यात कोरडा ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद आदिवासींसाठी राखीव आहे. या पदासाठी नऊ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये चितराम चंदन बेठेकर हे देखील होते. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी त्यांना देण्यात आलेल्या झाडू चिन्हावर जोरदार प्रचार देखील केला. काल सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर उमेदवारांना बॅलेट दाखविण्यात आले. त्यावेळी चितराम यांना धक्काच बसला. कारण त्यांनी ज्या चिन्हावर प्रचार केला ते चिन्हच बॅलेटवर नव्हते. हा प्रकार पाहून चितराम यांच्या भुवया उंचावल्या. या प्रकारानंतर ते दिवसभर घरात बसून राहिले.