गुलाबराव पाटील यांनीच जळगाव जिल्ह्यातील शिवसेना संपवली, असा गंभीर आरोप आमदार चिमणराव पाटील यांनी केला आहे. गुलाबरावांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. मी शिवसेनेतून बाहेर पडावे यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. आमच्या तक्रारी गुलाबरावांनी वरपर्यंत जाऊच दिल्या नाहीत. मी 29 वर्षे शिवसेनेत काम करत आहे. परंतु गुलाबरावांनी आम्हाला कधी सन्मान दिला नाही. गुलाबराव माझ्या विरोधात पोलिसांना फोन करायचे. एवढी खालची पातळी त्यांनी गाठली. गुलाबरावांच्या जाचाला कंटाळूनच मी शिंदेगट जवळ केला, असेही चिमणराव या क्लिपमध्ये म्हणाले आहेत.
गुलाबरावही शिंदे गटात आले आहेत तेव्हा तुमचे कसे होणार असे कार्यकर्त्याने विचारले असता ज्या माणसाला मंत्री केले तो फुटेल असे वाटले नव्हते. गुलाबरावांनी दहा जन्म घेतले तरी उद्धव ठाकरे यांनी केलेले उपकार फिटणार नाहीत. आता ते इकडे आले आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्या कानावर सगळे घातले आहे. बघू ते कशी दखल घेतात, असेही चिमणराव यांनी म्हटले आहे.